बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या क्रूर हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

बच्चू कडूंची प्रतिक्रिया
बच्चू कडू यांनी या घटनेवर बोलताना ती औरंगजेबाच्या क्रौर्यालाही मागे टाकणारी असल्याचे म्हटले. ते म्हणाले, “संतोष देशमुख यांची हत्या केवळ जातीय वाद नसून ही एक विकृती आहे. ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली ती क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडणारी आहे. एवढ्या मोठ्या घटनेनंतरही राजकीय नेते फक्त राजकारण करत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.”
पोलिस प्रशासनावरही सवाल
बच्चू कडू पुढे म्हणाले, “इतकी वर्षे ही प्रवृत्ती वाढली कशी? कोणी तिला खतपाणी घातले? याला जबाबदार फक्त आरोपी नाहीत, तर पोलिस प्रशासन आणि राजकीय व्यवस्थाही तितकीच जबाबदार आहे. बीडमध्ये इतकी वर्षे हे सगळं सुरू होतं, पण कोणीही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. आज ही हत्या उघडकीस आल्यामुळे हा विषय समोर आला आहे, पण याआधी बीडमध्ये काय सुरू होतं?”
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा
या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत. त्यांना या हत्येचा व्हिडिओ कॉलद्वारे थेट पाहिल्याचा आरोप करण्यात आला, त्यामुळे वाढत्या दबावामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. मोर्चाच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर IPC 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. तसेच, ही मागणी मान्य न केल्यास 6 मार्चनंतर राज्यभर मोर्चे काढून विधानभवनावर धडक देण्याचा इशारा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
राजकीय वातावरण तापले
संतोष देशमुख हत्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचंड असंतोष आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतरही विरोधक शांत बसण्याच्या मनःस्थितीत नाहीत. या प्रकरणाच्या तपासात पुढे काय घडते आणि सरकार यावर कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.