बीडच्या मस्साजोग गावातील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (4 मार्च) मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोघम प्रतिक्रिया देत तो नैतिकतेच्या कारणावरून दिला गेला, असे सांगितले. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर सडकून टीका करत अजित पवारांचे म्हणणे खोडून काढले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या – मुंडेंच्या ट्विटमध्ये नैतिकतेचा उल्लेख नाही
सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “अजित पवार आणि छगन भुजबळ म्हणत आहेत की धनंजय मुंडे यांनी नैतिक कारणावरून राजीनामा दिला. पण धनंजय मुंडेंचं स्वतःचं ट्विट पहा – त्यात त्यांनी तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. मग इथे नैतिकतेचा मुद्दा कुठे आहे?”
त्यांनी थेट मोबाईल उघडून मुंडेंचे ट्विट दाखवत अजित पवार यांचे म्हणणे खोटे ठरवल्याचा दावा केला.
अजित पवार विधानसभेत जाणे टाळले
या घडामोडीनंतर अजित पवार विधानसभेत हजर राहिले नाहीत आणि प्रसारमाध्यमांशी बोलणंही टाळलं. त्यांच्या देहबोलीत अस्वस्थता दिसून आली. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मोठी प्रतिमा मलीन झाली असून पक्षातील अनेक नेते चिंतेत आहेत, असेही बोलले जात आहे.
भाजपकडून देखील टीका
या प्रकरणावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील भावना व्यक्त करत संतोष देशमुख यांच्या आईची माफी मागितली आणि हत्येतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असून, पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता आहे.