बीडच्या मस्साजोग गावातील माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या घटनेला 82 दिवस उलटले, आणि अखेर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्या बोलताना भावूक झाल्या.

“मुंबईत काय घडतंय याची मला पूर्ण कल्पना नव्हती. मात्र, सोशल मीडियावरील पोस्ट पाहून परिस्थिती समजली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मी यापूर्वीच प्रतिक्रिया दिली होती. या अमानुष कृत्याच्या काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले, पण ते पाहण्याची माझी हिम्मत झाली नाही. ज्यांनी इतक्या क्रूरपणे मारहाण केली आणि ज्यांनी त्या घटनेचे व्हिडिओ बनवले, त्यांच्यात माणुसकी शिल्लक राहिली नाही. माझ्यात मात्र अशी निर्मनुष्यता नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, “गुन्हेगाराची कोणतीही जात नसते आणि गुन्हेगारांवर कारवाई करणाऱ्या राज्यकर्त्यालाही जात पाहता कामा नये. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या जबाबदारांना कठोर शिक्षा व्हावी. जर हे आरोपी माझ्या कुटुंबातील असते, तरीही मी त्यांना कठोर शासन करण्याचीच मागणी केली असती.”
यावेळी बोलताना पंकजा मुंडे भावूक झाल्या आणि त्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची, विशेषतः त्यांच्या आईची माफी मागितली. या हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हतबल झाल्याचे त्यांनी सांगितले आणि आरोपींना त्वरित न्यायालयीन शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.