बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावात संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापले आहे. न्यायासाठी संघर्ष करत गावकऱ्यांनी आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून हा आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू होणार असून, या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

आंदोलनाचा उद्देश आणि पार्श्वभूमी
संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले असले तरी आरोपींना अद्याप शिक्षा झालेली नाही. याप्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, तसेच इतर आरोपींवर कठोर कारवाई झाली नसल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर मस्साजोगमधील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनादरम्यान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील हेही उपस्थित राहणार असल्याचे समजते.
गावकऱ्यांच्या सात प्रमुख मागण्या
- तत्कालीन पोलीस अधिकारी PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना निलंबित करून सहआरोपी म्हणून समाविष्ट करावे.
- फरार आरोपी कृष्णा आंधळेला तातडीने अटक करावी.
- सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी.
- संतोष देशमुख हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा.
- वाशी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचे कॉल डिटेल्स (CDR) तपासून त्यांना सहआरोपी म्हणून कारवाई करावी.
- आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.
- संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालयात न नेता कळंबला वळविण्यामागील कारणांची चौकशी करावी.
या मागण्या मान्य होईपर्यंत गावकऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. न्यायासाठी उभारलेले हे आंदोलन पुढे कशा दिशा घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.