बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर संतोष देशमुख समर्थक आक्रमक झाले आहेत. या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली.

केज शहरात या बंदला जोरदार प्रतिसाद मिळत असून, शेकडो तरुण रस्त्यावर उतरले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तरुणांनी बाजारपेठेत फिरत दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं. यावेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
सीआयडीने या प्रकरणातील आरोपपत्र सादर केले असून, त्यामध्ये आरोपींनी संतोष देशमुख यांच्यावर केलेल्या अत्याचाराचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो समाविष्ट आहेत. हे क्रूर दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतोष देशमुख समर्थक संतप्त झाले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख समर्थकांनी सर्व आरोपींना कठोर शिक्षा, विशेषतः फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि पुढील घटनांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.