बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या झाल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असून, त्यांनी घटनास्थळी तब्बल १५ व्हिडिओ आणि ८ फोटो जप्त केले आहेत. या माध्यमातून संतोष देशमुख यांना झालेल्या अमानुष मारहाणीचे धक्कादायक तपशील उघड झाले आहेत.

या घटनेशी संबंधित मुख्य आरोपी वाल्मिक कराड हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधक आणि जनतेच्या वाढत्या दबावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितले. अखेर, वैद्यकीय कारणे पुढे करत धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा राजीनामा अपुरा असल्याचे सांगत मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “फक्त मंत्रिपदाचा राजीनामा नाही, तर धनंजय मुंडे यांची आमदारकीही संपेपर्यंत मी हा लढा थांबवणार नाही.”
या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती चांगलीच तापली असून, पुढील काळात या प्रकरणाला कोणती कलाटणी मिळते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.