बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून तब्बल तीन तास त्यांच्यावर अमानुष मारहाण करण्यात आली होती. विशेष म्हणजे, आरोपींनी या संपूर्ण घटनेचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढले होते, जे आता सीआयडीच्या हाती लागले आहेत.

सीआयडीच्या तपासात धक्कादायक माहिती
या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केले असून, त्यातून हत्या कशी घडली याचा तपशील उघड झाला आहे. तपासादरम्यान आरोपी महेश केदारच्या मोबाईलमधून हे व्हिडिओ आणि फोटो जप्त करण्यात आले आहेत. उपलब्ध पुराव्यांमध्ये संतोष देशमुख यांना निर्दयीपणे मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
व्हिडिओंमध्ये आरोपींचा सहभाग स्पष्ट
या व्हिडिओंमध्ये सुदर्शन घुलेसह इतर आरोपी संतोष देशमुख यांना मारताना स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळे तपास अधिक गंभीर वळणावर गेला आहे. राज्यभर या घटनेने खळबळ उडवली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.