संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने तब्बल 1800 पानी आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यामधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून या प्रकरणावर राज्यभरात चर्चा सुरू होती. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता CID च्या तपासातून मोठे खुलासे झाले आहेत.

“हे संघटित गुन्हेगारीचे जाळे” – धनंजय देशमुख
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोपपत्रावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हे गुन्हेगारी टोळीचेच काम आहे, जे आम्ही आधीपासून सांगत होतो. आता कागदोपत्री पुरावे, व्हिडीओ, ऑडिओ कॉल्स आणि सीसीटीव्ही फुटेजमुळे ते सिद्ध झाले आहे.”
CID च्या आरोपपत्रातील महत्त्वाचे मुद्दे
- मकोका कायद्यान्वये आठ जणांवर कारवाई
- वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचे स्पष्ट
- संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी आणि आधी आरोपींचे संभाषण
- हत्या करतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग CID च्या हाती
CID च्या तपासानुसार वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, संतोष देशमुख हा त्याच्या मार्गात अडथळा ठरत होता, म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली, असे आरोपपत्रात नमूद आहे.
आता पुढे काय?
CID च्या या आरोपपत्रामुळे प्रकरणाला नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणेकडून पुढील कारवाई आणि न्यायालयीन सुनावणीवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.