शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या आगामी पुस्तकाने ‘नरकातील स्वर्ग’ असे नाव असलेल्या वाचकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्यातील काही खुलासे आणि दावे समोर येत असून त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांवर जोरदार टीका करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या पुस्तकातील आशयाला ‘सिनेमाची पटकथा’ असल्याचे म्हणत, हे सर्व प्रसिद्धीसाठीचे नाटक आहे, असा आरोप केला. “मी काहीतरी मोठं बोलतो, मोठं लिहितो आणि लोकांनी त्याला सत्य मानावं, हा प्रकार म्हणजे प्रसिद्धीसाठी केलेली नौटंकी आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक कलाकार, व्यापारी, बिल्डर आणि राजकीय नेत्यांना मदत केली, पण त्यांनी कधीही त्याचा गवगवा केला नाही. उलट हेच लोक बाळासाहेबांच्या सावलीत वाढले.
शिरसाट यांच्या मते, राऊतांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा एक प्रकार आहे. “राजकारणात काही गोष्टी सांगून होत नाहीत, त्या अनुभवावरून आणि कृतीवरून सिद्ध कराव्या लागतात,” असे सांगून त्यांनी राऊतांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
त्यांनी पुढे राऊतांना इशारा देत म्हटले, “बोलायला लावू नका. आम्ही शेवटच्या दिवशी मातोश्रीमध्ये होतो. म्हणूनच आम्हाला काय काय माहीत आहे, हे तुम्हाला माहित नसावं. जर बोलायला लागलो तर परिणाम चांगले होणार नाहीत.” शिवाय, खरे शिवसैनिक हे आज शिवसेनेच्या नेतृत्वात आहेत, असं त्यांनी ठामपणे सांगितले.
राऊतांच्या राजकीय भूमिकेवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, “राऊतांसाठी राहुल गांधी हे शिवसेनाप्रमुखांपेक्षा मोठे वाटतात. ते इंग्रजीत लिहिणार, राहुल गांधी परदेशातून त्याचे प्रकाशन करणार, हे सगळं एक ठरवलेलं स्क्रिप्टप्रमाणे वाटतं.” याशिवाय, “संजय राऊत यांची मानसिकता एखाद्या दरोडेखोरासारखी आहे – आधी स्क्रिप्ट तयार करायची आणि मग योजना अमलात आणायची,” अशी तीव्र शब्दात टीका केली.
शेवटी, शिरसाट यांनी स्पष्ट केले की, शिवसेनाप्रमुखांनी अमित शहा यांना मदत केली हे खरे असले, तरी राऊतांनी या सगळ्याचा वापर करून स्वतःची छबी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या साऱ्या टीका आणि विधानांनी राजकारणाचा पारा चांगलाच वाढला आहे आणि संजय राऊत यांचं पुस्तक अधिकच चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे