रायगडमध्ये दिलेल्या एका भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी औरंगजेबाच्या कबरीविषयी केलेल्या विधानावरून सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच भाषणाला पकडत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शाहांवर टीकास्त्र सोडलं. त्यांनी अमित शाह यांनी औरंगजेबाच्या कबरीला “समाधी” म्हटल्याचा दावा केला.

या टीकेवर प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी राऊत यांना “जळणारे लाकूड” अशी उपमा दिली. “संजय राऊत वरून धूर निघतोय, ते आतून जळत आहेत. ते एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांबद्दल चिडलेले आहेत,” असे म्हस्के म्हणाले.
शिवरायांवर बोलण्याचा त्यांना अधिकारच नाही
नेहरू-गांधी घराण्याशी हातमिळवणी करून सत्ता मिळवणाऱ्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलण्याचा काहीच नैतिक अधिकार नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. “शिवाजी महाराजांबद्दल आपण ‘माझा शिवाजी राजा’ म्हणतो, ‘माझी आई’ म्हणतो, यात काही अपमान नसतो. हे नात्याने येणारे प्रेम असते,” असं स्पष्ट करत त्यांनी राऊतांच्या वक्तव्यांवर आक्षेप घेतला.
औरंगजेबबाबत प्रेम, आता शिवरायांविषयी प्रेम?
म्हस्के यांनी संजय राऊतांवर द्वैध भूमिकेचा आरोप करताना म्हटलं, की जेव्हा संसदेत औरंगजेबाची कबर उखडण्याची मागणी झाली होती, तेव्हा तुम्ही त्या कबरेच्या बाजूने बोलत होता. आज मात्र शिवाजी महाराजांविषयी प्रेम दाखवत आहात. “पाकिस्तानचे झेंडे नाचवणारे हेच लोक आज शिवरायांची आठवण काढत आहेत,” असेही त्यांनी टोला लगावला.
“गाढवालाही अक्कल असते!” – म्हस्केंचा खोचक सवाल
तहव्वूर राणाच्या भारत भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊतांना उद्देशून, “गाढवालाही अक्कल असते, मग तुमचं काय?” असा प्रश्न नरेश म्हस्केंनी केला. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत, असं सांगताना त्यांनी अमित शाह यांच्या कार्याचंही कौतुक केलं. “370 कलम हटवण्याचं स्वप्न बाळासाहेबांचं होतं, ते अमित शाह यांनी पूर्ण केलं,” असं ते म्हणाले.
या वादामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवराय, औरंगजेब आणि विचारधारा या मुद्द्यांवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची लाट उसळली आहे.