शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कालच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांना पाठिंबा दर्शवला. यावर संजय राऊत यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.

राऊत म्हणाले, “महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात आहेत, बेरोजगारी वाढत आहे आणि मराठी माणसांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत हे चांगले काम कसे म्हणता येईल? कुणाल कामरा यांचा स्टुडिओ फोडणे, मराठी लोकांना घर नाकारणे आणि मराठी संस्कृतीवर होणारे हल्ले हे सत्ताधारी पक्षाचे चांगले काम आहे का?”
राज ठाकरेंनी कालच्या भाषणात मराठी माणसांच्या विरोधात बोलणाऱ्यांना कानाखाली मारण्याचे विधान केले होते. त्यावर राऊतांनी टोमणा मारत विचारले, “मराठी माणसांच्या एकजुटीवरच भाजपने हल्ला केला. शिवसेनेची फूट पाडून संघटना उद्ध्वस्त केली. अशा वेळी राज ठाकरे कोणाच्या कानाखाली काढणार?”
सध्याच्या राजकीय वातावरणात राज ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातील ही टोलेबाजी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील या आरोप-प्रत्यारोपांनी राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.