शिवसेना (ठाकरे गट) चे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या अलीकडील ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडवून दिली आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले असून, विशेषतः बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मदत केल्याचा उल्लेख वादाच्या केंद्रस्थानी आहे.

राऊतांचा दावा आणि इशारा:
संजय राऊत म्हणाले की, “मी पुस्तकात लिहिलेल्या घटना 100 टक्के सत्य आहेत. मी याहून अधिक लिहू शकलो असतो, पण त्याने फार मोठा गदारोळ झाला असता. मी रामभक्त आहे, मर्यादा पाळतो.”
ते पुढे म्हणाले की, “मी जे पाहिलंय, त्याचा मी साक्षीदार आहे. बाळासाहेबांनी भाजपच्या अनेक नेत्यांना वेळोवेळी मदत केली, त्याचं फळ मात्र पक्ष फोडण्यात आणि माणसं फोडण्यात मिळालं.”
भाजपवर टीका:
राऊतांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधताना म्हटलं की, “तुम्हाला काय माहीत आहे त्या काळाबद्दल? तुम्ही तेव्हा कुठे होतात? पवारसाहेबांना जा, भेटा आणि मग बोला.”
त्यांनी मोदींनी शरद पवार यांना अमित शाहसाठी केलेल्या विनंतीचा उल्लेख करत म्हटलं की, “मोदी वारंवार म्हणायचे ‘मेरा खास आदमी है, आप मदद करो’ आणि पवारसाहेब विचारायचे – ‘ये कौन आदमी है?’”
भाजपकडून संताप, राऊतांचे प्रत्युत्तर:
या विधानांवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया आली असून गिरीश महाजन यांच्यासह अनेकांनी राऊतांची खिल्ली उडवली. मात्र, राऊत यांनीही प्रत्युत्तर देत म्हटलं, “हे विषय 25 वर्षांपूर्वीचे आहेत. ज्यांना माहित नाही त्यांनी आधी संपूर्ण पुस्तक वाचावं. फक्त नावांमध्ये अडकून जाऊ नका.”