शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गट आणि शंभुराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आनंद दिघे यांच्या काळात संजय राऊत शिवसेनेत नव्हते, असे वक्तव्य शंभुराज देसाई यांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देताना राऊतांनी शंभुराज देसाई यांच्यावर जोरदार शब्दबाण सोडले.

संजय राऊत म्हणाले, “शंभुराज देसाई कोण शिकवणार? काँग्रेसमधून शिवसेनेत उडी मारलेले हे नेते आज शिवसेनेच्या इतिहासावर भाष्य करतात. आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांचा वारसा समजून घेण्यासाठी त्यांनी प्रथम स्वतःचा इतिहास पाहावा. ज्या खटल्यांमध्ये गद्दारीचे आरोप झाले, त्या प्रकरणांमध्ये आमची भूमिका काय होती, हे नीट समजून घ्यावं.”
ते पुढे म्हणाले, “आज परिस्थिती अशी आहे की सत्ता टिकवण्यासाठी काही नेत्यांना गुलामी पत्करावी लागते. अमित शाह यांनी त्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत – फडणवीसांची सेवा करा, नाहीतर सत्तेपासून दूर व्हा. त्यामुळेच या नेत्यांना नाइलाजाने झुकावं लागत आहे.”
शंभुराज देसाई यांनी नाशिक मेळाव्याचा संदर्भ देत म्हटले होते की, “थोड्याच दिवसांत सगळे कार्यकर्ते शिंदे गटात सामील होतील.” यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिले, “छायाचित्रे काढून आम्हाला पाठवा, कोण कोण सामील होतंय ते बघू. सत्तेचा गैरवापर करून कार्यकर्त्यांना पैसे देऊन खरेदी करण्याचा हा नवा धर्मवीरांचा धर्म आहे. अशा धमक्यांचा आम्हाला काहीही फरक पडत नाही.”
राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. ते म्हणाले, “पूर्वी अंडरवर्ल्डमधून लोक धमक्या देत असत, लोकांना मारत, अपहरण करीत. आज त्याच पद्धतीने टोळ्यांच्या स्वरूपात राजकारण चालवले जात आहे. पक्ष फोडणे, घरं फोडणे, दुकानं फोडणे – हेच धोरण राबवले जाते. गुजरातमध्ये जसा पॅटर्न राबवला गेला, तसाच महाराष्ट्रातदेखील तो सुरू आहे.”
त्यांनी थेट अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. “अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पक्ष फोडण्याचे, सत्ता ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. पण या प्रक्रियेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे राजकीय आयुष्य संपुष्टात येईल,” असा इशारा राऊतांनी दिला.
या टीकास्त्रातून संजय राऊतांनी स्पष्टपणे दाखवून दिले की, उद्धव ठाकरे गट अजूनही लढण्याच्या मूडमध्ये आहे आणि सत्तेच्या दडपशाहीपुढे न झुकण्याची भूमिका कायम ठेवणार आहे.