शिवजयंतीच्या निमित्ताने देशभर सुट्टी जाहीर करावी, या उद्धव ठाकरे यांच्या मागणीवरून संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “गिरीश महाजन यांची मानसिक अवस्था बिघडलेली आहे. ते सध्या विविध प्रकरणांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांना परिस्थितीचे भान राहिलेले नाही,” असे राऊत यांनी म्हटले.

उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण देशात शिवजयंतीला सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. “महाराष्ट्रात शिवजयंतीला सुट्टी आहेच, पण आता देशभर ती असावी, अशी इच्छा आहे. मिस्टर महाजन, कानातील बोळे काढा आणि नीट ऐका,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी महाजन यांना सुनावले. त्यांनी पुढे सांगितले की, जर तुम्ही खरोखरच शिवभक्त असाल तर संपूर्ण देशात शिवरायांच्या जन्मदिवशी सुट्टी जाहीर केली पाहिजे.
यासोबतच राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, रायगडावर अमित शाह यांनी दिलेले शिवाजी महाराजांवरील प्रवचन अर्धवट व असत्य माहितीवर आधारित होते. शिवरायांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आणि औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला गेला. हे पाहता त्यांचे शिवरायांप्रती प्रेम केवळ दिखावा असल्याचा आरोप राऊतांनी केला.
मालवण येथे उभारण्यात येत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या अनुषंगानेही संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला. “समुद्रात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. परंतु याआधी पडलेल्या पुतळ्याच्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला, त्याचा तपास का झाला नाही? त्या प्रकरणातील दोषी आजही मोकाट आहेत. पुतळ्याच्या कामात कोट्यवधींचा अपहार झाला असून तो पैसा निवडणुकांमध्ये वापरण्यात आल्याचेही आरोप आहेत,” असे राऊत म्हणाले.
मुंबईतील बदलत्या लोकसंख्याविषयीही राऊतांनी चिंता व्यक्त केली. “भाजपा आणि इतर काही पक्षांच्या मूक समर्थनाने मुंबईचे गुजरातीकरण सुरू आहे. घाटकोपर परिसराला गुजरातसारखे संबोधले गेले. आम्ही याबाबत अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करू,” असा इशाराही त्यांनी दिला.
न्यायव्यवस्थेवर भाष्य करताना, संजय राऊत म्हणाले की, “न्यायदेवतेने डोळ्यावर पट्टी ठेवलेली असली पाहिजे. न्याय करताना कोण समोर आहे हे पाहू नये.” त्यांनी नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडून शोषित आणि लोकशाहीप्रेमी समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.