सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये एकत्र येण्याची शक्यता चर्चेत आहे. मात्र या प्रयत्नांना पक्षांतर्गतच विरोध असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी थेट पत्रकार परिषदेत दोन नेत्यांची नावे घेऊन स्पष्ट सांगितले की, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हेच दोन्ही गटांमध्ये एकत्र येण्यास अडथळा ठरत आहेत.

संजय राऊत म्हणाले की, एकीकडे हे नेते शरद पवार यांच्या विचारांचे समर्थक असल्याचे सांगतात, मूळ राष्ट्रवादी आमचीच असल्याचेही जाहीर करतात, परंतु जेव्हा दोन्ही गट एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा ते मागे हटतात. यामागे स्वार्थी राजकीय गणित असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राऊत यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर थेट टीका करताना त्यांना “महान नेते नव्हे” असे म्हणत एकप्रकारे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले. तर सुनील तटकरे यांच्या अध्यक्षपदाचा मुद्दा उपस्थित करत, एकत्रिकरणानंतर पक्षात नेतृत्वबदल होऊ शकतो, ही भीती तटकरे यांना असू शकते, असेही ते म्हणाले. तसंच केंद्रातील मंत्रिपदाच्या दाव्यावरही प्रश्न निर्माण होतो. यामुळेच हे नेते आपापले स्वार्थ पाहून एकत्र येण्यास टाळाटाळ करत आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
याआधीही राऊत यांनी “तहान लागली म्हणून गटारीचं पाणी कुणी पीत नाही” अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांच्या भाजपकडे झुकण्याच्या चर्चा संदर्भात टीका केली होती. त्यांनी नामोल्लेख न करता सूचक भाषेत विरोधकांवर ताशेरे ओढले होते.
महिला आयोगाच्या नेमणुकांबाबतही राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, अशा घटनात्मक संस्थांमध्ये अराजकीय, योग्य पात्रता असलेल्या व्यक्तींना संधी दिली पाहिजे. फक्त राजकीय नेत्यांच्या जवळच्या व्यक्तींना नेमणूक करून या संस्थांची विश्वासार्हता धोक्यात येते, अशी टीका त्यांनी केली.
भाजप महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा विचार करत असल्याच्या चर्चांवर राऊत म्हणाले की, त्यांचा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे, पण आम्ही आमच्या तयारीला सुरुवात केली आहे. आम्ही आमचा मार्ग ठरवला आहे.
शरद पवार यांच्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ते कोणाच्या कौतुकाने मोठे होत नाहीत, ते आधीच सह्याद्रीसारखे थोर व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळे कोण काय म्हणाले यावर त्यांच्या उंचीचा परिणाम होत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी शरद पवार यांच्याबाबत आपला आदर व्यक्त केला.