राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेलं खासदार संजय राऊत यांचं नवीन पुस्तक ‘नरकातील स्वर्ग’ प्रकाशनाआधीच गाजत आहे. या पुस्तकातील अनेक दावे, खुलासे आणि राजकीय किस्स्यांमुळे एकच खळबळ उडाली आहे. राऊत यांनी अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा काही विस्मयकारक गोष्टी उघडकीस आणल्या आहेत, ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे.

या परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्याशी संबंधित एक आठवण सांगितली. राऊत यांच्या मते, एकदा मुंबईतील नेस्को मैदानावर झालेल्या कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी आणि ते स्वतः उपस्थित होते. त्या काळात नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर होते. भाजपमधील सध्याचे अनेक प्रमुख चेहरे त्या वेळी दृश्यात नव्हतेच. राऊत यांनी सांगितले की, त्या कार्यक्रमाचा फोटो आणि त्याचा व्हिडिओ आजही त्यांच्या जवळ उपलब्ध आहे.
या प्रसंगानंतर काही वर्षांनी जेव्हा मोदी यांना पंतप्रधानपदासाठी उमेदवारी मिळाली, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी राऊत यांनी हसत उद्धवजींना म्हटले, “उद्धवजी, तुम्ही देशाचे पंतप्रधानच नियुक्त करताय की काय!” त्यावर उद्धव ठाकरे यांनीही हसत उत्तर दिलं, “हो रे, नरेंद्रभाईंना सांगायला पाहिजे की मी तुझ्या नावावर सही केली होती.”
राऊत यांचा दावा आहे की, भाजप आणि शिवसेनेमधील तेव्हाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते, परंतु आज भाजपमध्ये जे नेते आहेत त्यांना त्या काळातील नात्यांची फारशी कल्पना नाही. हे बरेच नेते इतर पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत, असंही राऊत म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी भाजप आणि शिवसेनेतील दरी वाढण्यामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा थेट उल्लेख केला. राऊत यांनी सांगितले की, अमित शाह दिल्लीतील राजकारणात सक्रिय झाल्यानंतरच शिवसेना-भाजप युतीत दुरावा वाढू लागला. त्यांनी यापूर्वीही असाच आरोप केला होता, मात्र या वेळी त्यांनी आणखी एक धक्कादायक दावा केला – त्यांनी अमित शाह यांना स्वतः फोन करून म्हटलं होतं की, “मला अटक करा!”
या संपूर्ण प्रकरणामुळे संजय राऊत यांचं नवीन पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच चर्चेत आलं आहे. त्यातील राजकीय दावे, किस्से आणि भाष्य यामुळे राज्यातील राजकीय वातावरणात नवा रंग भरला आहे. आगामी काळात या पुस्तकातील इतर खुलास्यांवर कसे प्रतिसाद येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.