शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्यांनी अनेक नेत्यांवर अप्रत्यक्ष हल्ले चढवले असून, माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी विशेषत: टोकदार शब्दांत टीका केली आहे.

राऊत यांनी तुरुंगवासाच्या काळातल्या अनुभवांवर आधारित हे पुस्तक लिहिलं असून, त्यामध्ये त्यांनी राजकीय कट-कारस्थानं, दबाव यंत्रणा आणि सत्तेचा गैरवापर याबद्दल सखोल भाष्य केलं आहे. त्यांनी हे पुस्तक केवळ प्रकाशनापुरतं मर्यादित न ठेवता, ते राज्यातील आणि देशातील प्रमुख राजकीय नेत्यांना पाठवलं आहे. राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनाही त्यांनी हे पुस्तक वाचण्यास पाठवलं आहे. त्यासोबत एक खास पत्रही दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना राऊत म्हणाले, “शिंदे साहेबांनी हे पुस्तक जरूर वाचावं. वाचायला आणि समजून घ्यायला त्यांना येत असेल तरच ते पुस्तक उपयोगाचं ठरेल.” हे विधान करताना त्यांनी शिंदेंना अप्रत्यक्षपणे वाचाल तर वाचाल या उक्तीचा संदर्भ देत टोला लगावला. ते पुढे म्हणाले की, “शिंदे माझ्यासोबत बराच काळ होते. माझ्या तुरुंगातील काळात काय चाललं होतं, याची त्यांना जाणीव आहे. त्यामुळे त्यांना हे पुस्तक अधिक खोलवर समजेल.”
राऊत यांचं म्हणणं आहे की, सत्तेच्या लोभापोटी भाजपच्या मदतीने शिंदे यांनी शिवसेनेत फूट घातली. त्यांच्या मते, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न झाला. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे या “जुलमी राज्यव्यवस्थेचे सूत्रधार” असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.
त्यांच्या मते, देशात असे अनेक नेते आहेत जे दबावाला बळी न पडता संघर्ष करत आहेत. या संघर्षशील प्रवृत्तीस सन्मान देण्यासाठीच हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. “हे पुस्तक त्यांच्या साठी आहे जे स्वाभिमानाने उभे राहिले, ज्यांनी भिती न बाळगता सत्याला सामोरं जाण्याची हिम्मत दाखवली,” असं ते म्हणाले.
राज ठाकरे यांचाही त्यांनी उल्लेख केला. “राज ठाकरे उत्कृष्ट वाचक आहेत आणि त्यांनीही अनेकदा सरकारी एजन्सींशी सामना केला आहे. त्यामुळे हे पुस्तक त्यांच्या अनुभवांशी संबंधित वाटेल,” असं राऊत यांनी म्हटलं.
एकूणच, ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक राजकीय दबाव, विश्वासघात आणि व्यक्तिगत संघर्षांचं एक प्रांजळ चित्रण आहे. यातून राऊत यांनी सत्तेच्या अतिरेकी वापराला उघडं पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे की त्यांनी हे पुस्तक वाचावं, समजून घ्यावं, आणि आत्मपरीक्षण करावं.