ईशान्य मुंबईतील महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहेत. मात्र, खासदार संजय दिना पाटील यांनी स्वतः या चर्चांना फेटाळून लावत स्पष्ट केलं आहे की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.

महाराष्ट्र सदन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमाला खासदार संजय दिना पाटील यांनी हजेरी लावली होती. तसेच, त्यांनी शिंदे यांच्या जेवणाच्या निमंत्रणालाही प्रतिसाद दिला होता. यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना अधिक जोर मिळाला. विशेषतः, आमदार राजन साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर या चर्चांना अधिकच उधाण आले.
मात्र, खासदार संजय दिना पाटील यांनी या सर्व चर्चा फक्त अफवा असल्याचे ठामपणे सांगितले आहे. “मी केवळ कार्यक्रम आणि जेवणाच्या निमंत्रणासाठी तिथे गेलो होतो. त्याचा चुकीचा अर्थ लावू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, ठाकरेंची शिवसेना सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले आहे.
यामुळे संजय दिना पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.