छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध कोणी लावला, यावरून नव्याने वादंग निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि लोकमान्य टिळकांचे वंशज रोहित टिळक यांनी दिलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

इतिहासात असं मानलं जातं की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर शिवरायांची समाधी शोधून तिचं महत्त्व अधोरेखित केलं. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडेच केलेल्या वक्तव्यात लोकमान्य टिळकांनी ती समाधी शोधल्याचं म्हटलं, ज्यावर रोहित टिळकांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित टिळक यांचं स्पष्टीकरण
सोलापुरात आयोजित ‘श्री भगवान परशुराम क्रिकेट प्रीमिअर लीग 2025’ च्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना रोहित टिळक म्हणाले, “ब्रिटिश अधिकारी डगलस याने प्रथम रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी अस्वच्छता असल्याचं नमूद केलं होतं. त्यानंतर लोकमान्य टिळक आणि महात्मा फुले गडावर गेले आणि समाधी परिसरात साफसफाई सुरू झाली.”
ते पुढे म्हणाले, “त्या काळात रायगड हा इंग्रजांच्या ताब्यात असलेला किल्ला होता. तिथे जाण्यासाठी परवानगी लागायची. टिळक आणि फुले दोघांनीही तेथे जाऊन शिवरायांच्या समाधीचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कोणाने समाधी ‘शोधली’ यावरून वाद निर्माण करण्यापेक्षा त्यांच्या कार्याला गौरव देणं अधिक महत्त्वाचं आहे.”
शिवजयंतीच्या आयोजनाची सुरुवात
डगलसच्या अहवालानंतर जनजागृतीसाठी अनेक उपक्रम सुरू झाले. रोहित टिळक म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी पुण्यात मोठी सभा घेत शिवजयंती साजरी करण्याची कल्पना मांडली. त्यांनी शिवरायांच्या कार्याचं स्मरण ठेवण्याचा आग्रह धरला आणि पुढे ती परंपरा सुरू झाली.
इतिहासाच्या आधारे बोलायला हवं – रोहित टिळक
“इतिहासातील संदर्भ, पुस्तकं आणि दस्तऐवज यांच्या आधारावरच आपण चर्चा करतो. यामध्ये कुणाला श्रेय द्यावं यापेक्षा, त्या ऐतिहासिक कार्याचं महत्त्व ओळखणं गरजेचं आहे,” असं टिळक यांनी स्पष्ट केलं.