छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थिती लावली आणि आपल्या भाषणातून अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरतो.

शाह म्हणाले, “मी येथे भाषण करण्यासाठी किंवा राजकारणासाठी आलेलो नाही. मी शिवचरित्र अनुभवण्यासाठी आणि शिवमुद्रेला प्रणाम करण्यासाठी आलो आहे. ही मुद्रा केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी आदर्श आहे.”
त्यांनी जिजाऊ मातेच्या भूमिकेवर विशेष प्रकाश टाकत म्हटले की, “जिजाऊ माँसाहेबांनी केवळ शिवाजी महाराजांना जन्म दिला नाही, तर त्यांना स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषेची दिशा दिली. एका तरुण शिवाजीला देशासाठी लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली.”
अमित शाह यांनी सांगितले की, “शिवाजी महाराजांच्या काळात संपूर्ण देश अंधारात होता. स्वराज्य ही कल्पनाही अशक्य वाटत होती. मात्र केवळ १२ वर्षांच्या वयात भगवा झेंडा संपूर्ण देशभर फडकवण्याची शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती.”
त्यांनी हेही नमूद केले की, “कोणताही पूर्वसंचित वारसा नसताना, एकमेकांमध्ये फूट पाडणाऱ्या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी मुघलशाहीला आव्हान दिलं. त्यांची सैन्यव्यवस्था आणि राज्यकारभार हा आदर्श ठरला.”
शाह पुढे म्हणाले, “अलमगीरचा पराभव महाराष्ट्राच्या भूमीत झाला आणि त्याचं स्मारकही येथे आहे. यावरूनच समजतं की या मातीत किती ताकद आहे. आज संपूर्ण जग शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेत आहे.”
ते म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या तीन महान संकल्पना — स्वधर्माचा अभिमान, स्वराज्याची आकांक्षा आणि स्वभाषेवर श्रद्धा — या केवळ सीमित क्षेत्रापुरत्या मर्यादित नाहीत. त्या मानवी स्वाभिमानाशी निगडित आहेत.”
अमित शाह यांनी विनंती केली की, “शिवाजी महाराजांचं चरित्र प्रत्येक भारतीय विद्यार्थीपर्यंत पोहोचलं पाहिजे. ते केवळ महाराष्ट्राचे नाहीत, तर संपूर्ण भारताचे अभिमान आहेत.”