महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाकीत वर्तवले की एकनाथ शिंदे गट लवकरच भाजपात विलीन होईल आणि शिंदे यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येईल.

संजय राऊतांचा मोठा दावा
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “2029 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही. भाजप आणि शिंदे गट भविष्यात एकत्र राहणार नाहीत. शिंदे यांचे काम संपले आहे आणि हे त्यांनाही माहीत आहे.”
शिंदे गट भाजपात सामील होणार?
राऊत पुढे म्हणाले, “शिंदे गट भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्यातील एक मोठा गट कोकणातील नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाईल. तुम्ही हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, मी सही देतो!”
महायुतीतील अंतर्गत कुरघोडी वाढल्या
राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले असले तरी आतल्या गोटात नाराजीचा सूर कायम आहे. पालकमंत्रिपदावरून तिढा सुटलेला नाही, तसेच तिन्ही पक्षांत कुरघोडी सुरू असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
“लढण्याची इच्छाशक्ती नसलेले जात आहेत”
शिवसेनेतील इनकमिंग-आउटगोइंग संदर्भात राऊत म्हणाले, “सत्ता आणि पैशाच्या दबावामुळे काहीजण पक्ष सोडत आहेत. पण आम्ही खचणारे नाही. लढण्याची इच्छाशक्ती नसलेले जात आहेत, त्यांना ठेवून काही उपयोग नाही.”
संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.