वैष्णवी हगवणे या तरुणीने आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात हगवणे कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली असून, यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

वैष्णवी हिने सासरच्या त्रासामुळे आत्महत्या केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिची सासू लता हगवणे आणि नणंदला आधीच अटक केली होती. आता फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, “पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना अटक केली असून, पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि गांभीर्याने पार पडेल.”
फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “या प्रकरणात पोलिस योग्य ती पावलं उचलतील. प्रकरणाचा शेवट न्याय्य व्हावा, यासाठी सर्व आवश्यक कारवाई केली जाईल.” मकोका (MCOCA) कायदा या प्रकरणात लागू होईल का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “मकोका लावण्यासाठी विशिष्ट अटी आहेत. त्या पूर्ण झाल्यासच तो कायदा लागू केला जाऊ शकतो. त्यामुळे सध्या याबाबत निश्चित काही सांगता येणार नाही.”
याच वेळी त्यांनी महिलांवरील अत्याचारांबाबत सुद्धा कठोर भूमिका मांडली. ते म्हणाले, “२१व्या शतकात अजूनही सून किंवा मुलींना दुय्यम वागणूक देणं हे अत्यंत निंदनीय आहे. अशा कृत्यांना समाजात जागा नाही. हे केवळ चुकीचंच नाही, तर पाप आहे.”
याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सुद्धा काहींनी सवाल उपस्थित केले. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “अजित पवार हे या लग्नात सामाजिक दृष्टिकोनातून सहभागी झाले होते. त्यांना त्यावेळी पुढे काय होईल याची कल्पना नव्हती. त्यामुळे या विषयात त्यांच्यावर आरोप करणे योग्य नाही.”
पोलिसांच्या मते, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे. सर्व पुरावे गोळा करून आरोपींवर दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे. प्रकरण न्यायाच्या अंतिम टप्प्यापर्यंत नेण्याचा पोलिसांचा मानस आहे.
या संपूर्ण घटनेमुळे राज्यात सामाजिक सजगतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वैष्णवीसारख्या अनेक मुलींच्या सुरक्षेसाठी कायदे कडक आणि अंमलबजावणी अधिक प्रभावी होणे ही काळाची गरज बनली आहे.