शिवसेना शिंदे गटाच्या संघटनात्मक बैठकीदरम्यान पालघरमध्ये राजकीय वाद उफाळून आला आहे. शिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत दोन वादग्रस्त व्यक्तींना पुन्हा पक्षात घेऊन थेट व्यासपीठावर स्थान देण्यात आल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.

‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपी मिहीर शाहचे वडील आणि शिवसेनेचे माजी उपनेते राजेश शहा, यांना काही काळापूर्वी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र, या बैठकीत त्यांना पुन्हा व्यासपीठावर स्थान देण्यात आले. यामुळे शिंदे गटाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
याच बैठकीत वसई-विरार महापालिकेचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर, ज्यांच्यावर एका बिल्डरकडून १० कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे, त्यांचाही पक्षप्रवेश करण्यात आला. नवघर पोलिसांनी बांदेकर यांना २५ लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात अटक केली होती. त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह इतर आरोपींमध्ये किशोर काजरेकर, निखिल बोलार आणि हिमांश शहा यांचा समावेश होता.
बंधकाम व्यावसायिक आकाश गुप्ता यांच्या वरळीतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी ही खंडणी मागण्यात आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे बांदेकर यांचा पूर्वी ठाकरे गटाशी संबंध होता, पण आता त्यांनी पुन्हा शिंदे गटात प्रवेश केला आहे.
या घडामोडींचा केंद्रबिंदू ठरलेली शिवसेनेची बैठक मनोर येथील एका रिसॉर्टमध्ये पार पडली. उपस्थितांमध्ये आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावित, रवींद्र फाटक यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र, विवादित नेत्यांना व्यासपीठावर स्थान दिल्यामुळे शिंदे गटाच्या निर्णय प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत शंका निर्माण झाली आहे.
कार्यक्रमात आणखी एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यासपीठावर जाणे टाळून सामान्य कार्यकर्त्यांमध्ये बसणे पसंत केले, तर प्रकाश निकम या बैठकीपासून दूर राहिल्याने ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.