भाजपचे आमदार परिणय फुके यांनी भंडाऱ्यात झालेल्या भाजप मेळाव्यात केलेल्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. फुके यांनी “शिवसेनेचा बाप मीच आहे” असे वक्तव्य केल्याने शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून त्यांनी माफीची मागणी केली आहे. अन्यथा “शिवसेना स्टाइल” मध्ये उत्तर दिले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

या कार्यक्रमात बोलताना फुके म्हणाले की, “काही चांगले झाले तर आईचे कौतुक होते, वाईट झाले तर बापाला दोष दिला जातो. त्यामुळे मला कळून चुकले की शिवसेनेचाही बाप मीच आहे.” या विधानामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये संताप उसळला आहे. शिंदे गटाचे लोकसभा प्रमुख संजय कुंभलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन फुके यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी ठामपणे सांगितले की, “शिवसेनेचे खरे बाप म्हणजे बाळासाहेब ठाकरे होते. त्यामुळे कोणीही जबरदस्तीने ‘बाप’ बनण्याचा प्रयत्न करू नये.”
फुके यांच्यावर आणखी गंभीर आरोप करण्यात आले. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला साथ देत शिवसेनेच्या उमेदवार डॉ. प्रकाश मालगावे यांचा पराभव घडवून आणल्याचा आरोप कुंभलकर यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, फुके यांनी काँग्रेस उमेदवाराला सहा मते मिळवून देण्याचे षड्यंत्र रचले होते, ज्यामुळे शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला.
या साऱ्या घडामोडींवरून शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून, भाजप नेत्यांनी अशा वादग्रस्त वक्तव्यांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन करत म्हटले की, “फुके यांना ताबडतोब रोखा, नाहीतर आम्ही ‘शिवसेनेचा बाप कोण आहे’ ते दाखवून देऊ.”
हा वाद आता राजकीय रंग घेऊ लागला असून, भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधील नात्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.