विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ही बैठक ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात पार पडली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचे अडीच-अडीच वर्षांचे वाटप करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, ठाकरे गटाने यावर अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. बैठकीला उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती होती, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलही या चर्चेत सहभागी झाले होते.
याशिवाय, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने आपली दावेदारी स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीत या पदांच्या वाटपावर अंतिम निर्णय अद्याप झाला नसून, राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी अडीच-अडीच वर्षांच्या संकल्पनेवर भर दिला जात आहे.
सध्या विधान परिषदेत अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत, परंतु काँग्रेसकडूनही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी आग्रह धरला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत यासंदर्भात काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.