राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी “जसे आम्ही पक्ष फोडतो, तसे तुम्ही विद्यार्थी फोडा,” असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.

रोहित पवारांची जोरदार टीका
सोशल मीडियावर रोहित पवार यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत त्यांना टोला लगावला.
“विद्यार्थी जर फोडले गेले नाहीत, तर त्यांच्या मागेही मंत्री महोदय ED, CBI, IT च्या चौकशा लावतील का, अशी भीती वाटते,” असं खोचक भाष्य करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
गुणवत्तेवर भर द्या, विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील – पवार
तसंच त्यांनी सल्लाही दिला की, “विद्यार्थ्यांची संख्या वाढवायची असेल तर ‘फोडाफोडी’ न करता शाळांमध्ये आवश्यक सुविधा व शिक्षक द्या. तेव्हा शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील.”
गुलाबराव पाटलांचं विधान नेमकं काय होतं?
12 एप्रिल रोजी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले होते की, “जसे आम्ही आमच्या पक्षात इतर पक्षातील लोकांना आणतो, त्याच पद्धतीने शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना आणलं पाहिजे.” मात्र, त्यांच्या या विधानावरून अनेकांकडून टीका होत आहे.
सफाई देत म्हणाले – तो एक विनोद होता
वाद वाढताच गुलाबराव पाटील यांनी सारवासारव करत स्पष्टीकरण दिलं की, “मी हे वक्तव्य विनोदाने केलं होतं. त्यामागे कोणताही गैरविचार नव्हता.”