सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या मजबुतीसाठी कार्यकर्त्यांना दिशानिर्देश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा मिळावा, यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत.

नितेश राणे म्हणाले, “माझ्या आमदारकीच्या काळात मला निधी मिळण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. आता मी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा विकास सुनिश्चित करणार आहे. मात्र, हा विकास महायुतीच्या कार्यकर्त्यांना प्राधान्याने मिळेल. विरोधकांच्या गावांना निधी मिळेलच असे नाही. ज्यांना विकास हवा आहे, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा.”
यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन निधी तसेच सरकारकडून मिळणाऱ्या निधीच्या वाटपाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या मते, महायुतीशी संबंधित गावांना विकासासाठी प्राधान्य दिले जाईल, तर विरोधी पक्षाच्या नेतृत्वाखालील गावांना निधी मिळणार नाही.
राणे यांनी पुढे सांगितले की, “मी कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत की, महाविकास आघाडीच्या सरपंचांची यादी तयार करा. त्यांना निधी मिळणार नाही. विकासासाठी भाजपचा विचार करा.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.