बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, निलंबित पोलिस अधिकारी रंजित कासले यांनी या प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट करत दावा केला की, त्यांना कराडच्या एन्काउंटरची ऑफर मिळाली होती.

या वक्तव्यावर आता सामाजिक कार्यकर्त्या करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, “वाल्मिक कराडकडे अनेक संवेदनशील माहिती असल्यामुळे त्याचा एन्काउंटर करण्याची सुपारी दिली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः मंत्री धनंजय मुंडेंच्या काही गंभीर प्रकरणांची माहिती त्याच्याकडे असल्याची चर्चा आहे.”
शर्मा म्हणाल्या, “पाच कोटी रुपयांची सुपारी ही काही मोठी रक्कम नाही. मंत्र्यांचे बजेट हजारो कोटींचं असतं, त्यामुळे ते शंभर कोटींचीदेखील ऑफर देऊ शकतात. सध्याचं राजकारण हे संपूर्णपणे पैशांवर अवलंबून आहे.”
त्यानंतर त्यांनी अंजली दमानिया यांचंही उदाहरण दिलं, “अंजलीताई रोज नवनवीन खुलासे करत आहेत, मात्र अनेक प्रकरणं धनशक्तीच्या आधारे दाबली जात आहेत. कराड हा फक्त एक प्यादा आहे.”
पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
यावेळी रणजित कासले यांना पुन्हा सेवेत घेण्यासंबंधी विचारण्यात आले असता, शर्मा म्हणाल्या, “जर अशा अधिकार्यांच्या जिवाला धोका निर्माण होत असेल, तर सामान्य नागरिकांचं काय होईल? त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी गृह मंत्रालयाने घ्यायला हवी.”