मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड याला तुरुंगात विशेष सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. कराड तुरुंगातून व्हिडिओ कॉलद्वारे दोन-दोन तास लोकांशी संवाद साधतो, तसेच त्याला उत्तम जेवणही मिळते, असे दमानियांनी सांगितले.

करूणा शर्मा यांचा खुलासा: दमानियांचे आरोप सत्य
दमानियांच्या या आरोपांना आता करूणा शर्मा यांनी दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, “मी स्वतः 16 दिवस बीडच्या त्या तुरुंगात राहिले आहे. माझा नवरा अर्धा-अर्धा तास फोनवर बोलत होता, मला बाहेरून फाईव्ह-स्टार हॉटेलचे जेवण दिले जात होते. त्यामुळे अंजली दमानिया यांनी केलेले आरोप 100% बरोबर आहेत.”
धनंजय मुंडेंवर निशाणा; राजीनाम्याची मागणी
करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, “धनंजय मुंडेंसारखे लोक मंत्रालयात नकोत. वाल्मिक कराड हा मुंडे यांची सावली आहे. त्याच्याकडे हजारो कोटींची मालमत्ता आहे, त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायलाच हवा.”
अंजली दमानियांचा आरोप: तुरुंग प्रशासन दुर्लक्ष करतंय?
दमानिया यांनी आणखी गंभीर दावा केला की, बीड तुरुंगातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, त्यामुळे कोणालाही उत्तरदायी ठरवता येत नाही. “कराडला कोणत्याही वकिलाच्या नावाखाली कुणीही भेटू शकतं, व्हिडिओ कॉलद्वारे गप्पा मारू शकतं. त्याला तुरुंगात अत्यंत आरामदायी सुविधा मिळत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार
या पार्श्वभूमीवर करूणा शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले. वाल्मिक कराडला तुरुंगातील विशेष सोयी कशा आणि का दिल्या जात आहेत, याबाबत सरकारने स्पष्टता द्यावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
राजकीय वातावरण तापणार?
या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर होणाऱ्या आरोपांमुळे विरोधक अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसते.