बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर मुख्य संशयित आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले. देशमुख हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेचा विषय ठरला असून, त्याच्याशी संबंधित अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. तो सध्या कारागृहात आहे.

दरम्यान, एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याने नुकतीच धक्कादायक माहिती समोर आणली आहे. रंजित कासले या अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, कराडचा एन्काऊंटर करण्याचा प्रस्ताव त्याला देण्यात आला होता. त्याने हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारल्याचेही सांगितले.
काय म्हणाले कासले?
एका व्हिडीओत कासले म्हणतात, “अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणावर मी एक बातमी पाहिली. त्यावरून मला सांगायचं आहे की, अशा बनावट एन्काऊंटरमध्ये काय घडतं हे मला माहिती आहे. मला देखील वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाली होती. पण मी ती नाकारली कारण मला असं पाप करणं शक्य नव्हतं. अशा प्रकरणात प्रचंड पैसे देण्याचं आश्वासन दिलं जातं – 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी – कितीही! मी सायबर क्राईम विभागात होतो, त्यामुळे माझी निवड केली असावी.”
अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया
या वक्तव्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तीव्र टीका केली. त्यांनी कासले यांना ‘विक्षिप्त’ संबोधले आणि असे आरोप प्रसिद्धीसाठी केल्याचे म्हटले. “जेव्हा तुम्ही अधिकारी होता, तेव्हा अशी माहिती समोर का आणली नाही? सायबर क्राईम विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याला एन्काऊंटरचे आदेश दिले जातात, यावर विश्वास बसत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.