कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील लाडकी महादेवी हत्तीण (उर्फ माधुरी) नुकतीच गुजरातमधील ‘वनतारा’ प्रकल्पात हलवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे हे हलवणं शक्य झालं असलं, तरी नांदणीसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात यावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जनतेतून संतापाचे सूर उमटत असतानाच, अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी सोशल मीडियावर एक भावनिक आणि थेट पोस्ट लिहून सरकार, वनतारा प्रकल्प आणि PETA या संस्थेवर गंभीर आरोप केले आहेत.
किरण माने लिहितात, “‘वनतारा’ला एक प्रशिक्षित हत्ती हवा होता. संपूर्ण भारतातून शोध घेतल्यावर दोन हत्तीणी निवडल्या गेल्या. त्यातली एक केरळची होती, पण केरळवाल्यांनी तिला देण्यास नकार दिला. मग ‘व्यापारी’ नांदणीत आले आणि महादेवीला घेण्यासाठी पैशांचं आमिष दाखवलं. पण नांदणीकरांनी तो सौदा नाकारला.”
यानंतर कथेत ‘पेटा’ या संस्थेची एन्ट्री झाली. पेटाचे डॉक्टर महादेवीला तपासायला आले आणि त्यांनी तिच्या पायाला इजा असल्याचं सांगितलं. त्यांनी आरोप केला की तिची इथे योग्य देखभाल होत नाही. मात्र, नांदणीच्या डॉक्टरांनी सांगितलं की महादेवी पूर्णपणे निरोगी आहे. तरीही न्यायालयासकट सगळं यंत्रणा पैशांसमोर झुकली, असा आरोप मानेंनी केला.

“महादेवीचा आणि नांदणीचा एकमेव संबंध होता — माया. गावातली पोरंही माहेरी आल्यानंतर आधी तिचीच भेट घेत. ती नांदणी सोडताना तिच्या डोळ्यातून वहाणारे अश्रू काळीज हलवून गेले,” असं भावनिक वर्णन त्यांनी केलं.
माने यांनी यापूर्वीही ताडोबा अभयारण्यातून रिलायन्सला १३ हत्ती देण्याच्या निर्णयावर टीका केली होती. “गुजरातमध्ये एकही हत्ती नव्हता, पण आता देशभरातून तिथे हत्ती नेत आहेत. पेटा हे यामागचं हुकमी कार्ड आहे,” असं ते म्हणाले.
माने यांचा इशारा स्पष्ट होता — महादेवीवरून सुरू झालेली ही मालिका पुढे आणखी मठांपर्यंत पोहोचणार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कर्नाटकातील शेडबाळ, अकलनूर आणि बिचले येथील मठांनाही आता नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
“धुआँ जो कुछ घरों से उठ रहा है… न पूरे शहर पर छाए, तो कहना !”
— हाच किरण माने यांचा शेवटचा शब्द होता — साक्षीभाव नाकारणाऱ्या व्यवस्थेवर सडेतोड टोला.