जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतेच नशिराबाद येथे विविध विकास कामांचा शुभारंभ केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत आपली तळमळ उघडपणे मांडली आणि आपल्या राजकीय प्रवासातील काही अनुभवही सांगितले.

तुमच्या आशीर्वादामुळे मी पुन्हा निवडून आलो
गुलाबराव पाटील म्हणाले, “या निवडणुकीत मी परत येणार नाही असं अनेकांना वाटलं होतं. पण माझ्या लाडक्या बहिणींनी एक उत्तम कार्यक्रम उभा केला आणि तुमच्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे मी विजयी झालो. मंत्रीपद पुन्हा मिळेल की नाही यावरही शंका होती, पण तुमच्या कृपेने तेही शक्य झालं आणि तेच खातं मला पुन्हा मिळालं.”
पालकमंत्रीपदावरून वाद न होता एकतेचं उदाहरण
गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद झाले. मात्र, जळगावमध्ये तसा कोणताही वाद झाला नाही. मी स्वतः गिरीश महाजन पालकमंत्री झाले तरी चालेल असं म्हटलं, आणि त्यांनीही तेच उत्तर दिलं. जर संयम बाळगून, सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं, तर त्याचे परिणाम नेहमीच सकारात्मक होतात.”
एकनाथ शिंदे-अजित पवार यांच्यावर प्रतिक्रिया टाळली
सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थ खात्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे काही मुद्दे मांडल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, “अशा मोठ्या नेत्यांच्या अंतर्गत घडामोडींवर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने बोलणे योग्य ठरणार नाही.”