महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजने विषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये मिळणार असल्याचे आश्वासन दिले होते, मात्र अजूनही हा वाढीव हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे अनेक लाभार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या विषयावर चर्चा झाली. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, “महिलांना 100% 2100 रुपये देण्याचा आमचा निर्धार आहे. पाच वर्षांसाठी ठरवलेला जाहीरनामा आम्ही अंमलात आणत आहोत. पहिल्या टप्प्यात सुमारे 1.75 कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळाला, त्यानंतर हा आकडा 2.45 कोटींवर गेला. आता 2.52 कोटी महिलांना मदत दिली जाणार आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी याअधिवेशनात 2100 रुपये त्वरित मिळतील, असे कुठेही जाहीर केले नाही.”
सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे लाडकी बहीण योजनेबाबतचा गोंधळ काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, महिलांना प्रत्यक्षात 2100 रुपये कधी मिळतील, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे या विषयावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.