महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजनेबाबत अलीकडे अनेक चर्चा रंगत आहेत. काहीजण असा दावा करत आहेत की, योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम 1500 रुपयांवरून 500 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, “लाडकी बहिण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. अटी आणि नियम तसेच आहेत. कोणत्याही प्रकारे शासन निर्णयात फेरबदल झालेला नाही. त्यामुळे 1500 रुपये ऐवजी 500 रुपये मिळतील असा जो प्रचार सुरू आहे, तो केवळ गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आहे.”
त्यांनी पुढे सांगितलं की, “कोणत्याही महिलेकडून पैसे मागण्यात आलेले नाहीत किंवा कुणावर गुन्हाही दाखल केलेला नाही. सरकारकडून पात्र लाभार्थ्यांनाच रक्कम दिली जात आहे. काही श्रीमंत महिलांनी चुकीने लाभ घेतल्याचं निदर्शनास आलं असलं तरी योजनेची अंमलबजावणी नियमांनुसारच होत आहे.”
2100 रुपये कधी मिळणार?
या योजनेत 2100 रुपये देण्याचं आश्वासन निवडणुकीपूर्वी देण्यात आलं होतं. यावरही जयस्वाल यांनी उत्तर दिलं – “राज्याचं उत्पन्न जसजसं वाढतं, तसतशा योजना टप्प्याटप्प्याने विस्तारल्या जातील. ‘लाडकी बहिण’, ‘नमो शेतकरी’, आणि ‘संजय गांधी निराधार’ अशा योजनांच्या लाभार्थ्यांना वचनबद्धतेप्रमाणे लाभ देण्यात येईल.”
आतापर्यंतचा वाटचाल ऐतिहासिक – जयस्वाल
जयस्वाल यांनी असंही नमूद केलं की, “आम्ही अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत. याची नोंद भविष्यात नक्की घेतली जाईल. राज्याच्या उत्पन्नाच्या मर्यादेत राहून आम्ही काम करत आहोत आणि कुठलाही आर्थिक बोजा टाकलेला नाही. कोणतीही मागणी दुर्लक्षित केलेली नाही.”