मुंबई: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे पक्षातील परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. विरोधी पक्ष प्रभावीपणे लढत नाही, लोकांमध्ये नाराजी आहे, तसेच पक्षातील काही नेत्यांना वाटते की मी कुठेतरी कमी पडत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे पक्षातील त्यांची भूमिका आणि त्यांच्यावर असलेली जबाबदारी याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीस ते आजारी असल्यामुळे हजर राहू शकले नाहीत, त्यामुळे त्या चर्चेबाबत ते काही सांगू शकत नाहीत. मात्र, अद्याप त्यांच्यावर कोणतीही मोठी जबाबदारी आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. याचा अर्थ ते नाराज आहेत असे नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“लोकांसाठी लढत राहणार”
पक्षाचा पाठिंबा असो वा नसो, आपण नेहमीच लोकांच्या हितासाठी काम करत आलो आहोत आणि करत राहू, असे त्यांनी ठामपणे सांगितले. शरद पवार यांचा पाठिंबा आपल्याला आणि पक्षातील कार्यकर्त्यांना कायम लाभला असून तोच पाठिंबा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षात अंतर्गत अस्वस्थता आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.