
अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विधानांनी पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना सोलापूरकर म्हणाले, “मी रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजन कुटुंबात जन्मलेला भीमराव, ज्याला आंबावडेकर नावाच्या गुरुजींनी दत्तक घेतलं आणि त्यानंतर त्याच नावावरून भीमराव आंबेडकर म्हणून ओळखलं जाऊ लागलं. वेदांमध्येही भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात.”
या विधानानंतर समाजाच्या विविध स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त करत सोलापूरकर यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आधीच्या वक्तव्यावरूनही निर्माण झाला होता वाद
याआधीही सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले होते, असे विधान केले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. मात्र, या विधानांमुळे संतप्त झालेल्या जमावाच्या विरोधामुळे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
सोलापूरकर यांच्यावर कारवाईची मागणी कायम
सोलापूरकर यांच्या विधानामुळे समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेक संघटनांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसला तरी, आंदोलक यावर ठाम आहेत.
याआधीही सोलापूरकर यांनी विविध वादग्रस्त विधानं केली होती. मात्र, एका आठवड्यातच सलग दोन मुद्द्यांवरून निर्माण झालेल्या वादामुळे आता हा विषय अधिक गाजतो आहे.