कल्याण पूर्व येथे 2007 मध्ये झालेल्या विजय पाटील यांच्या हत्येप्रकरणी 18 वर्षांनंतर कल्याण न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या खटल्यात न्यायालयाने तीन आरोपींना दोषी ठरवले असून, इतर दहा जणांची निर्दोष सुटका केली आहे. निर्दोष मुक्त झालेल्यांमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी महेश पाटील यांचाही समावेश आहे.

विजय पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते वंडार पाटील यांचे पुत्र होते. १० एप्रिल २००७ रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आरोप असा होता की, २३ मार्च २००६ रोजी झालेल्या बाळा भोईर यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी विजय पाटील यांना मारण्यात आले. या प्रकरणी एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयाने विजय बाबुराव वाकडे, साजिद हमीद शेख आणि सुनील रामचंद्र भोईर या तिघांना दोषी ठरवले असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्यांची अंतिम शिक्षा ७ ऑगस्ट रोजी सुनावली जाणार आहे. त्याच वेळी इतर दहा आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
महेश पाटील यांच्या बचावासाठी त्यांचे वकील हरीश सर्वोदय यांनी न्यायालयात ठोस पुरावे सादर केले. त्या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत ते कल्याण न्यायालयात उपस्थित असल्याचे पुरावे होते. त्यामुळे त्यांची गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाली.
वकीलांनी याचिकेत असेही नमूद केले की मृत व्यक्तीच्या शरीरात गोळीचे कोणतेही चिन्ह आढळले नाही. तपास अधिकारी देखील आता हयात नाहीत. त्यामुळे दोषी ठरवलेल्या तिघांवर नेमकी कोणती कलमे लावण्यात आली आहेत, हे ७ ऑगस्ट रोजी स्पष्ट होणार आहे.
सध्या या खटल्यामुळे न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण आहे. तसेच या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचे संकेत वकीलांनी दिले आहेत.