राज्यात अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य थोर राष्ट्रपुरुषांविषयी अपमानास्पद वक्तव्ये व कृती घडल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे जनतेत संतापाचं वातावरण निर्माण झालं असून, अशा व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. त्यांनी जाहीर केलं की, राष्ट्रपुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर शिक्षा होईल, अशा स्वरूपाचा कायदा राज्यात लवकरच लागू केला जाईल.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या संदर्भात उदयनराजे भोसले यांनीही काही महत्त्वाच्या मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या. त्यांनी यावेळी हेही नमूद केलं की, लोकशाही व्यवस्थेमुळे कठोर पण कायदेशीर पावले उचलावी लागतील, मात्र अशा प्रकारांना माफ केली जाणार नाही.
मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी शिवाजी महाराजांचा गौरव करताना म्हटलं की, परकीय सत्ता जिथे अंधःकार पसरवत होत्या, तेव्हा जिजाऊंच्या संकल्पातून शिवरायांचे तेजस्वी नेतृत्व उदयास आले. त्यांनी सर्व जाती-धर्मांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि संपूर्ण देशात भगव्याचा अभिमान फडकवला.
यासोबतच त्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली – छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमाणबद्ध इतिहास राज्य शासनामार्फत प्रकाशित केला जाईल, जेणेकरून चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना आधार राहणार नाही.
शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा यादीसाठी नामांकित झाले असून, लवकरच फ्रान्समध्ये त्यावर सादरीकरण होणार आहे. यामुळे या ऐतिहासिक वास्तूंचा जागतिक पातळीवर गौरव होण्याची शक्यता वाढली आहे.
शेवटी, फडणवीसांनी नवी दिल्लीमध्ये शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचाही निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, यासाठी केंद्र सरकारकडून सहकार्य घेतले जाईल.