छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५व्या पुण्यतिथीनिमित्त रायगड किल्ल्यावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही सहभागी झाले होते.

या विशेष प्रसंगी आयोजकांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण नियोजित होते. मात्र, कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी आपली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देत, त्यांना बोलण्याची संधी दिली. शिंदेंनीही अचानक मिळालेल्या या संधीचा उपयोग करत आपले भाषण दिले. परंतु, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र बोलावलेच गेले नाही, आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या कार्यक्रमात मोजकीच भाषणे नियोजित होती, ज्यात उपमुख्यमंत्र्यांची नावे नसल्याचे सांगितले जात आहे. पण शिंदेंना मिळालेली अपवादात्मक संधी आणि पवार यांना संधी न मिळणं – हे राजकीय संकेत देत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
शिंदेंनी आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या निर्णयांचे कौतुक केले. त्यांनी अनुच्छेद ३७० हटवण्याचा निर्णय, नक्षलवाद आणि दहशतवादाविरोधातील कारवायांचा विशेष उल्लेख केला. तसेच, तहव्वूर राणा याला भारतात आणण्याचा प्रयत्नही यशस्वी होईल आणि त्याला शिक्षा दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.