रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद अद्यापही रिक्त असून, या मुद्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी यासंदर्भात स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत, भरत गोगावले यांच्याकडे हे पद न गेल्यास तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, असा ठाम इशारा दिला आहे.

“रायगडसारखा ऐतिहासिक जिल्हा पालकमंत्र्याविना राहणं ही दुर्दैवी गोष्ट आहे,” असं म्हणत दळवी यांनी आशा व्यक्त केली की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड भेटीनंतर न्याय मिळेल. ते पुढे म्हणाले, “शिवरायांचा मावळा असलेले भरत गोगावले हेच या पदासाठी योग्य उमेदवार आहेत आणि रायगडवर होणारा अन्याय यामुळे थांबेल.”
दळवी यांनी असेही सूचित केले की, भरतशेठ गोगावले यांना जबाबदारी मिळाली नाही, तर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढेल आणि संभाव्य उठाव होणार हे निश्चित आहे.