मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार तहव्वूर राणा याला अखेर भारतात आणण्यात आलं असून, त्याच्या शिक्षेबाबत आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य करत राणाला बिहार निवडणुकीच्या काळातच फाशी दिली जाणार असल्याचा दावा केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, “राणा हा अनेक वर्षांपासून भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू होता. ही प्रक्रिया काँग्रेसच्या काळात सुरू झाली होती. त्यामुळे याचं श्रेय घेण्यासाठी कोणी राजकीय फायद्यासाठी भांडवल करू नये.” राऊत यांनी हेही सुचवलं की या निर्णयाचा उपयोग निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी केला जाऊ नये.
नीरव मोदी, मेहुल चौकसी आणि कुलभूषण जाधव प्रकरणावरही भाष्य
राऊत यांनी या वेळी अन्य महत्त्वाच्या प्रकरणांवरही लक्ष वेधलं. देशातून फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांचं प्रत्यार्पण लवकरात लवकर व्हावं, अशी त्यांनी मागणी केली. तसेच पाकिस्तानात कैद असलेल्या माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतात परत आणण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने 2016 मध्ये अडकवलं असून, त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप करत फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे संपूर्ण प्रकरण भारताच्या प्रतिष्ठेशी जोडलेलं आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
राजकारण थांबवा, कारवाई करा
तहव्वूर राणाला शिक्षा देण्यास उशीर नको आणि त्याचवेळी या प्रकरणावर राजकारण होऊ नये, हा राऊत यांचा स्पष्ट संदेश होता. देशाच्या सुरक्षेसाठी आणि न्यायासाठी कठोर पावलं उचलण्याची ही वेळ आहे, असं त्यांनी ठामपणे नमूद केलं.