मराठी चित्रपटसृष्टीत ‘झेंडा’ (2010) हा चित्रपट अत्यंत वादग्रस्त ठरला होता. दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा हा पहिलाच चित्रपट, आणि त्याच्या स्क्रिप्टमुळेच राज्यभरात खळबळ उडाली. या चित्रपटात काल्पनिक कथानक असूनही त्याचे संदर्भ महाराष्ट्रातील त्या काळच्या राजकीय घडामोडींशी जोडले गेले. विशेषतः काही पात्रं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या राज ठाकरे यांच्याशी जोडली गेली, आणि त्यामुळे सिनेमाला मनसेकडून जोरदार विरोध झाला.

याच पार्श्वभूमीवर, ‘झेंडा’मधील प्रमुख अभिनेता संतोष जुवेकरनं अलीकडेच एका मुलाखतीत या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकला. त्याने सांगितले की, “त्यावेळी सिनेमा बंद पाडण्याचा खूप दबाव होता. आम्हाला भीती वाटत होती की, हा सिनेमा कदाचित प्रदर्शित होणारच नाही. पण राज ठाकरे यांनी खूप मोठेपणा दाखवला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं – ‘जर मला व्हिलन दाखवून मराठी सिनेमा मोठा होणार असेल, तर मला काही हरकत नाही. मराठी सिनेमा मोठा होऊ दे.’”
या वक्तव्यानं वातावरण पूर्णपणे बदललं. संतोषने सांगितलं की, वांदना टॉकीजबाहेर शो बंद करण्यासाठी काही कार्यकर्ते उभे होते. पण राज ठाकरे यांचा आदेश आल्यानंतर सर्व विरोध मागे घेतला गेला. अगदी विरोध करणारे कार्यकर्तेही थिएटरमध्ये बसून सिनेमा पाहायला लागले आणि त्यांनी नंतर स्वतः कबूल केलं की, “हा सिनेमा खरोखर चांगला आहे.”
संतोष जुवेकरनं हेही सांगितलं की, ‘झेंडा’मधील “संत्या” हे पात्र अवधूत गुप्ते यांनी विशेषतः त्याच्यासाठी लिहिलं होतं. एक कलाकार म्हणून ही भूमिका त्याच्यासाठी खूप खास होती.
शेवटी, सोशल मीडियावर सिनेमा किंवा कोणतीही गोष्ट पूर्ण समजून न घेता लगेच व्यक्त होणाऱ्या लोकांवरही संतोषने टीका केली. “पहिलं लाईक, पहिली कमेंट माझीच पाहिजे” असा अट्टहास कुणाच्या तरी नुकसानाला कारण ठरू शकतो, असंही त्याने ठामपणे सांगितलं.
‘झेंडा’ केवळ एक सिनेमा नव्हता, तर मराठी सिनेमात विचारांचा, धैर्याचा आणि संवादाचा झेंडा रोवणारी कलाकृती होती – आणि त्यामागे राज ठाकरे यांचाही सकारात्मक सहभाग विसरता येणार नाही.