मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या गंगाजल आणि महाकुंभस्नानावरील वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे.

राऊत म्हणाले, “जर राज ठाकरे यांच्या जागी समाजवादी पक्ष, काँग्रेस, शरद पवार गट किंवा आमच्या पक्षाचा कुणी नेता असता आणि त्याने हेच वक्तव्य केलं असतं, तर भाजप आणि शिंदे गटाने मोठा गदारोळ निर्माण केला असता. भाजपच्या तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी रस्त्यावर उतरून निषेध मोर्चे काढले असते.”
राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना गंगाजलाच्या स्वच्छतेबाबत उपरोधिक विधान केलं होतं. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मात्र, भाजपने यावर संयमित प्रतिक्रिया दिली, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधलं. “राज ठाकरे हे भाजपचे सहकारी आहेत. काही काळापूर्वी त्यांनी हिंदुत्वाचा जोरदार नारा दिला आणि अचानक हिंदुत्ववादी बनले. त्यामुळेच त्यांच्या वक्तव्यावर भाजप गप्प आहे,” असा आरोप राऊत यांनी केला.