पनवेल | शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मराठी भाषा, मराठी माणूस, उद्योगधंदे आणि जमिनी या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट शब्दांत सरकारची कडक समाचार घेतली.

“तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय, हे ज्यावेळी समजेल, तेव्हा आम्ही अंगावरच येऊ,” असा थेट इशारा त्यांनी दिला. ते म्हणाले की, राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या धोरणांमुळे महाराष्ट्राच्या हिताला धोका निर्माण होतो आहे.
गुजराती साहित्य संमेलनावर टीका करताना त्यांनी सांगितलं की, “महाराष्ट्र स्वतः गुजराती साहित्य संमेलने भरवतंय. हे केवळ प्रेमापुरतं मर्यादित नाही. इथं मराठी-गुजराती माणसांमध्ये वाद निर्माण करून त्यातून राजकीय लाभ कसा मिळवता येईल, हे पाहिलं जातंय.”
राज ठाकरे हे शेकापच्या कार्यक्रमाला दुसऱ्यांदा उपस्थित राहिले असून, त्यांनी जयंत पाटील यांना रायगड जिल्ह्याची जबाबदारी घ्यावी, असंही सूचित केलं.
या भाषणातून त्यांनी पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.