शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय मार्ग वेगळे झाले. मात्र, त्यांच्या पुनर्मिलनाबद्दलची चर्चा मराठी जनतेमध्ये वारंवार होत राहिली. रविवारी एका लग्न समारंभात दोन्ही बंधू एकत्र आल्याने ही चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे.

या संदर्भात शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, “दोन भाऊ एकत्र आल्यावर आनंद होतो. अशा भेटी नियमित व्हाव्यात, त्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते,” असे विधान केले. मात्र, त्यांनी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांच्यावरही टीका करत, “महाराष्ट्राच्या शत्रूसोबत हातमिळवणी होऊ नये. शिवसेना फोडून शिंदेंच्या हाती ज्यांनी सत्ता सोपवली, त्यांच्याशी युती करू नये,” असा इशारा दिला.
रविवारी शासकीय अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाच्या लग्न समारंभात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात संवाद रंगला. हा प्रसंग पाहून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या संभाव्य एकत्रीकरणाबाबत तर्कवितर्क सुरू झाले.
राऊत यांनी भाजपवर टीका करत, “अमित शाह आणि मोदी यांनी महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड संपवण्याचे ठरवले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या साथीदारांनी वेगळा पक्ष स्थापन केला असला तरी ठाकरे हे ठाकरेच राहतील,” असे सांगितले.
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत निश्चित काहीही सांगता येत नसले, तरी त्यांच्या भेटीने नवा राजकीय समीकरणांचा अंदाज वर्तवला जात आहे.