महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर एक नवीन घडामोड घडताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद बाजूला ठेवून भविष्यात एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, “आमच्यातील भांडणं लहान आहेत, महाराष्ट्र मोठा आहे,” असं म्हणत दोन्ही गटांनी एकत्र येण्याच्या शक्यतेचं संकेत दिले आहेत.

राज ठाकरेंच्या या विधानानंतर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं की, “माझ्याकडून कोणतंही भांडण नव्हतं. जर महाराष्ट्र विरोधकांपासून स्वतःला दूर ठेवायचं ठरवलं, तर आम्हीही एकत्र येण्याचा विचार करू शकतो.” या प्रतिक्रियांमुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, यावर जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, या चर्चांवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, “जर दोघेही एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल. कोणत्याही मतभेदांना मागे टाकून जर कोणी एकत्र येत असेल तर ते स्वागतार्ह आहे. मात्र सध्या माध्यमांनी जास्त गोंधळ घातला आहे. त्यामुळे थोडी वाट बघा.” फडणवीस यांचा हा मृदू आणि सकारात्मक सूर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया मात्र थोडीशी आक्रमक वाटली. सातारच्या दौऱ्यावर असताना, राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबद्दल विचारलं असता, एकनाथ शिंदे चांगलेच संतापले. त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा माईक दूर सारला आणि कोणतंही उत्तर न देता तिथून निघून गेले. त्यामुळे शिंदे गट या संभाव्य युतीबाबत नाखुष असल्याचे संकेत मिळाले आहेत.
या संपूर्ण घडामोडींचं मूळ राज ठाकरे यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत आहे. त्या मुलाखतीत, “मी लार्जर पिक्चर पाहतो. महाराष्ट्राच्या हितासाठी जुन्या भांडणांना मागे टाकणं गरजेचं आहे,” असं त्यांनी नमूद केलं. त्यांच्या या विधानानंतर उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक संकेत दिल्याने दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यतेवर सध्या सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे.
आगामी काळात ठाकरे बंधू खरोखरच हातमिळवणी करणार का, की राजकीय समीकरणं पुन्हा नव्या वळणावर जाऊन थांबणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.