राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे नेते, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, एकत्र येण्याच्या शक्यतेची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही बंधूंनी एकमेकांशी संवाद साधण्याची तयारी दर्शवल्यामुळे या एकतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या गुप्त बैठकीचादेखील मोठा गाजावाजा झाला, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही काहीतरी बदल होणार का, अशी चर्चा सुरू झाली.

या सर्व पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली. मीडियाशी संवाद साधताना, अजित पवार यांच्यासोबतच्या बैठकीबाबत विचारले असता, शरद पवार यांनी सांगितले की, “आम्ही जनतेच्या कामांसाठी एकत्र आलो होतो. खास करून ऊस उत्पादन आणि कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी ही बैठक झाली.” त्यांनी हेही स्पष्ट केलं की, सरकारच्या प्रतिनिधींसोबत चर्चेत काहीही वावगे नाही, कारण उद्देश शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणे हाच होता.
याच वेळी शरद पवार यांनी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाल्याची माहितीही दिली. बारामतीपासून या उपक्रमाची सुरुवात झाली असून, ऊस शेतीत AI चा वापर केल्यामुळे खत वाचते, पाण्याचा अपव्यय कमी होतो आणि जमिनीचा पोत सुधारतो. त्यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि वित्त क्षेत्रांमध्येही होऊ शकतो, पण त्यांचा प्राधान्यक्रम शेतीवर आहे.
पुढे बोलताना शरद पवार यांनी सांगितले की सरकारने ऊसासोबत आणखी पाच पिकांवर AI तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकेल. त्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्रात पाणीसाठ्याचीही गंभीर परिस्थिती आहे, यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, सध्या राज्यात फक्त ४३ टक्के पाणीसाठा उरला आहे. मे आणि जून महिने काटकसरीने पाण्याचा वापर करून पार करावे लागतील, अशी शेतकऱ्यांना सूचना त्यांनी केली. या दोन महिन्यांत विशेष काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेवटी, उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य एकतेबाबत विचारले असता शरद पवार यांनी अत्यंत संयमित प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, “मला त्यांच्या चर्चेबद्दल कोणतीही माहिती नाही. मी त्यांच्याशी बोललोही नाही, त्यामुळे या विषयावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”