बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ब्राह्मण समाजावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे ते वादात अडकले होते. या प्रकरणावर पडदा टाकत अनुरागने अखेर सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहून ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागितली आहे.

अनुरागने म्हटलं आहे की, “रागाच्या भरात मी मर्यादा ओलांडली आणि संपूर्ण ब्राह्मण समाजावर टीका केली. हा समाज माझ्या आयुष्यात कायम उपस्थित राहिला आहे. माझ्या आयुष्यात त्यांच्या योगदानाची मोठी भूमिका आहे. त्यामुळे माझ्या बोलण्याने त्यांना दुखावणं हे अत्यंत चुकीचं होतं.” त्याने पुढे स्पष्ट केलं की, “एका ट्रोलरला उत्तर देताना मी अनावश्यकपणे सर्व समाजावर टीका केली, ज्याचा मला आता पश्चात्ताप होत आहे.”
या वादामुळे अनुरागवर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली होती. इतकंच नव्हे तर मुंबई पोलीस आयुक्तांकडे त्याच्या विरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्यामुळे अनेकांकडून संताप व्यक्त केला जात होता.
आपल्या पोस्टमध्ये अनुरागने याचा आणखी खुलासा करत लिहिलं, “माझ्या घरच्यांनादेखील या प्रकरणामुळे त्रास झाला आहे. अनेक बुद्धिमान व्यक्ती, ज्यांचा मी आदर करतो, ते देखील माझ्या बोलण्याच्या पद्धतीने नाराज झाले आहेत. मी स्वतःच्याच मुद्द्यावरून भरकटलो. त्यामुळे मी संपूर्ण ब्राह्मण समाजाची मनापासून माफी मागतो.”
तो पुढे म्हणतो, “मी माझ्या रागावर काम करणार आहे. भविष्यात कोणत्याही मुद्द्यावर बोलताना योग्य शब्द वापरायचं वर्तन मी अंगीकारेन. माझ्या बोलण्याने ज्या लोकांचा अपमान झाला, त्या सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे.”
दरम्यान, या वादानंतर अनुरागच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या दिल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अनुरागने पुन्हा एकदा सोशल मीडियावर लिहिलं, “माझी चूक झाली आहे, पण कोणत्याही परिस्थितीत माझ्या मुलीला किंवा कुटुंबीयांना धमकावणं योग्य नाही. संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्यांनी असे वागणं अपेक्षित नाही.”
या प्रकरणातून अनुराग कश्यपने एक मोठा धडा घेतला असल्याचं दिसतंय. सध्या सोशल मीडियावर या प्रकरणावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.