पुण्यातील आघाडीचे नेते आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा आगामी राजकीय प्रवास चर्चेचा विषय बनला आहे. सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांना पक्षात सहभागी होण्याची ऑफर दिली आहे.

राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी धंगेकरांना खुलं आमंत्रण देत त्यांचे कौतुक केले. “रवी भाऊ, तुम्ही एक निष्ठावान आणि सक्षम लोकप्रतिनिधी आहात. राजकारणात विजय-पराजय हे चालतच असते, पण तुमचे काम महत्त्वाचे आहे. अजित दादांसोबत तुमचे संबंध चांगले राहिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबत येण्याचा विचार करावा,” असे त्यांनी म्हटले आहे.
तथापि, धंगेकरांनी आधीच भगव्या रंगाचा झेंडा हाती घेतल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांसोबत एक महत्त्वाची बैठक बोलावली असून, लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसला रामराम ठोकून ते शिवसेनेत जाणार की अजित पवारांसोबत जातील, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.