विधानसभेत मोबाईलवर रमी खेळताना दिसलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषीखातं हटवण्यात आलं असून, आता या खात्याची जबाबदारी मंत्री दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात आली आहे. तर भरणेंकडे असलेलं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय कोकाटेंकडे देण्यात आलं आहे.
राज्याच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान कोकाटे हे सभागृहात मोबाईलवर रमी खेळताना आढळले. या घटनेचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर करत सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर विरोधकांनी कोकाटेंचा राजीनामा घेण्याची मागणी केली. मात्र सरकारने राजीनामा न घेता त्यांचं ‘डिमोशन’ करत केवळ खातं बदललं.
कृषीखात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणेंकडे
कोकाटेंच्या खातेबदलाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. आता कृषी मंत्रालय दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात आलं आहे. दुसरीकडे, कोकाटेंकडे क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय सोपवण्यात आलं आहे.
गेल्या काही काळात कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त विधानं केली होती. त्यातच सभागृहात रमी खेळल्यामुळे वाद अधिकच पेटला. मात्र, सरकारने कारवाईच्या नावाखाली फक्त खातं बदलल्याने विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
विरोधकांचा सवाल – ही काय शिक्षा?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खोचक टीका करत म्हटलं, “केवळ खातेबदल म्हणजे काय शिक्षा? आता रमी खेळाला राज्याचा अधिकृत खेळ घोषित करा आणि मंत्र्यांना पत्ते घेऊन सभागृहात येण्याची मुभा द्या.”
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी असा आरोप केला की, “राष्ट्रवादीचा एक मंत्री राजीनामा देतो, पण शिंदे गटातील कोणीही जबाबदारी घेत नाही. कोकाटेंना वाचवण्यामागे काही गुपितं आहेत का?”
“राजीनामा घेतल्याशिवाय जनतेला समाधान नाही” – राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट सांगितलं की, “कोकाटेंनी याआधीही शेतकऱ्यांबाबत हलकट विधानं केली आहेत. आता सभागृहात रमी खेळल्यावरही त्यांचा राजीनामा घेतला नाही. हे अन्यायकारक आहे. त्यांच्या राजीनाम्याशिवाय जनतेला समाधान मिळणार नाही.”